
स्मार्ट मीटरची सक्ती आणि त्यामुळे नागरिकांना येणाऱ्या वाढीव बिलाविरोधात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत वडाळा येथील बेस्ट कार्यालयावर धडक दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरविरोधात निषेध व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बेस्ट प्रशासनाने दादर येथील एका इमारतीमध्ये ग्राहकांची सहमती न घेताच स्मार्ट मीटर बसवले होते. हे मीटर बसवल्यानंतर बिलामध्ये प्रचंड वाढ झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी संघटनेचे सरचिटणीस निखिल सावंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिष्टमंडळाने वडाळा कार्यालयातील बेस्ट उपक्रमाचे मुख्य अभियंता शरद पवार यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर कोणत्या अधिकारात बसवले आणि बिलांमध्ये अचानक एवढी मोठी वाढ का झाली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक शेंडे, खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, संजय पावले, अॅड. अभिराज परब, विजय पवार, विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे, सतीश नाटेकर, विक्रम शहा, महेंद्र बिरवटकर, शेखर यादव, निशिकांत भरेकर, संतोष हिनुकले, शशिकांत नागावकर व रहिवासी उपस्थित होते.
‘टेस्ट मीटर’ बसवून तपासणी करणार शिवसेनेच्या दणक्यानंतर पवार यांनी संबंधित इमारतीमध्ये पुढील तीन महिने ‘टेस्ट मीटर’ बसवून सर्व ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली जाईल, तसेच तपासणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने बिल आकारणी झाल्याचे निष्पन्न झाल्यास ग्राहकांना योग्य ती सवलत व दिलासा दिला जाईल, असे आश्वासन दिले.



























































