
न्यायपालिकेत लैंगिक शोषण हे एक घाणेरडे गुपित असून अनेक महिला न्यायाधीशांना याचा सामना करावा लागतो. अनेक महिला न्यायाधीशांनी त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी केला. त्यांच्या गौप्यस्फोटानंतर खळबळ उडाली आहे.
डी. एस. बोरकर स्मृती व्याख्यानात ‘माय व्हिजन ऑफ इंडियाः 2047 एडी’ या विषयावर त्या बोलत होत्या. इंदिरा जयसिंग यांनी न्यायपालिकेतील लैंगिक शोषणाची काळी बाजू यावेळी सांगितली. त्या म्हणाल्या, वकील म्हणून काम करताना माझा अनेक महिला न्यायाधीशांसोबत संपर्क आला. मी अनेक महिला न्यायाधीशांची बाजू मांडली. या महिला न्यायाधीश त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. म्हणूनच मी हिंदुस्थानातील न्यायपालिकेत लैंगिक शोषण हे एक घाणेरडे गुपित असल्याचे माझ्या पुस्तकात लिहिले आहे. या भयाण वास्तवासंदर्भात कोणीच बोलू इच्छित नाही, असे जयसिंग म्हणाल्या.
‘आयटम नंबर’वर नाचायला सांगितले
इंदिरा जयसिंग यांनी एका धक्कादायक घटनेबाबत सांगितले की, लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या एका महिला न्यायाधीशाने मला त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती. संबंधित न्यायाधीशाने त्यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला संबंधित पीडित महिला न्यायाधीशाला बोलावले होते. या पार्टीत या आणि एका आयटम नंबरवर डान्स करा, असे त्यांना सांगितले होते. मात्र, विरोध केल्यानंतर महिला न्यायाधीशाला नोकरी सोडावी लागली, असे जयसिंग म्हणाल्या.
म्हणून न्यायपालिकेत होतेय लैंगिक शोषण
इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, न्यायपालिकेत एक पदानुक्रम तयार झालेला आहे. उच्च न्यायालयाचे एखादे न्यायाधीश निवृत्त होतात, त्यावेळी जिल्हा महिला न्यायाधीशांना एका रांगेत एकाच रंगाची साडी नेसून डायनिंग रुममध्ये जाताना सर्व पुरुष न्यायाधीशांवर फुलांचा वर्षाव करण्यास सांगितले जाते. ही उच्च न्यायालयातील एक प्रथा असल्याचे एका महिला न्यायाधीशाने सांगितल्याचे जयसिंग यावेळी म्हणाल्या.

























































