
सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या खडकाळ समुद्रात आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ (IND MH 5 MM 1484) ही बोट समुद्राच्या प्रचंड लाटेमुळे उलटल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर एका युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले.
दांडी येथील मच्छीमार सन्मेष सुरेश परब (49), अक्षय हनुमंत राणे (30) आणि सुयोग सन्मेष परब (22) हे तिघे पहाटेच्या सुमारास ‘सागरिका’ बोटीने मासेमारीसाठी किल्ले सिंधुदुर्गलगतच्या समुद्रात गेले होते. सकाळी सातच्या सुमारास किल्ल्याच्या पाठीमागील खडकाळ भागात समुद्र अचानक खवळला. काही कळण्याच्या आतच आलेल्या एका महाकाय लाटेने बोटीला जोरदार धडक दिली. लाटेचा तडाखा इतका जबरदस्त होता की, बोट क्षणात उलटली आणि तिघेही समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.
























































