
ऑगस्ट महिन्यात म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा पाऊस कमीच पडणार असल्याने उष्णता वाढणार आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 91 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सप्टेंबर महिन्यात देशातील पावसाची दीर्घकालीन सरासरी 167.9 मिलिमीटर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर-पश्चिम, ईशान्य, पूर्व आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागांत तसेच दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भारतातील काही तुरळक भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात पावसाचे वितरण असमान राहण्याचे संकेत आहेत. बहुतांश भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
ऑगस्टमध्ये पावसाची तूट
ऑगस्टमध्ये देशभरातील पावसाचे प्रमाण 213.3 मिलिमीटर नोंदले गेले. 1901 नंतरचा हा ऑगस्टमधील 17 वा सर्वात कमी पाऊस असून 2001 नंतरचा सातवा सर्वात कमी पाऊस ठरला आहे.
























































