
अमेरिकेची प्रसिद्ध पेमेंट कंपनी पेपाल (PayPal) ने हिंदुस्थानात मोठी कपात केली आहे. कंपनीने आपल्या ग्लोबल रिस्ट्रक्चरिंग (जागतिक पुनर्रचना) योजनेअंतर्गत हिंदुस्थानातील सुमारे 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही संख्या हिंदुस्थानातील एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 10 टक्के आहे. या कपातीचा सर्वाधिक फटका तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering), ऑपरेशन्स, पेमेंट्स आणि फायनान्स विभागातील कर्मचाऱ्यांना बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने 31 ऑगस्ट 2026 रोजी घेतलेल्या व्हर्च्युअल कॉलमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याची माहिती दिली. हा कॉल संपल्यानंतर लगेचच नोकरीवरून काढलेल्या काही कर्मचाऱ्यांकडून कंपनीच्या सिस्टम्सचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात आले. कंपनीने कर्मचाऱ्यांना सुमारे एक महिन्याचा पगार आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पण काही कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अटींमुळे योग्य भरपाई मिळण्याबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हिंदुस्थानात पेपलच्या चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील टेक आणि ऑपरेशनल केंद्रांवर या कपातीचा मुख्य प्रभाव पडला आहे. या तिन्ही शहरांमधील विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे.
पेपल सध्या आपला खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. कंपनीच्या जागतिक धोरणाचा भाग म्हणून पुढील दोन ते तीन वर्षांत जगभरातील आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 20 टक्के कपात करण्याचे त्यांचे नियोजन आहे. ज्या अंतर्गत जगभरात जवळपास 4,760 नोकऱ्या कमी केल्या जाणार आहेत.

























































