हिंदुस्थानात प्रधानमंत्री पदाची आणि गृहमंत्री पदाची वेकेंसी! फडणवीसांना दिल्लीत बोलावणार आणि मोठी जबाबदारी देणार – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावी पंतप्रधानपदाच्या चर्चेवर फडणवीस यांनी स्वतः एका मुलाखतीत ‘पंतप्रधानपदासाठी वेटिंगवर असणारे आयुष्यभर वेटिंगवरच राहतात’ असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, देशात सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री दोन्ही पदांसाठी वेकन्सी आहे. सध्या दीर्घकाळापासून ‘प्रायमिनिस्टर इन वेटिंग’ म्हणून अमित शहा स्वतःला मानतात. मात्र तसे होण्याची शक्यता दिसत नसल्याचे शक्यता संजय राऊत यावेळी म्हणाले. तर दुसरे राजनाथ सिंह आहेत, त्यांच्याविषयी मला शंका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवायचे आहे आणि त्यांना मोठी जबाबदारी द्यायची आहे एवढंच मला माहीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आतल्या गोटातल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये तत्काळ दिल्लीत कार्यरत नसलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीची किंवा नेत्याची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती व्हावी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. ती संघाची भूमिका हळूहळू तुमच्यासमोर येईलच. संघाचं म्हणणं आहे, मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा वारसदार म्हणून सक्सेसर म्हणून जी व्यक्ती देणार आहोत, त्याची उपपंतप्रधानपदी निवड व्हावी; ती सध्या दिल्लीत नाही. एवढंच मला माहीत, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार याचमुळे रखडला आहे का, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, नक्कीच. कारण त्यासाठी काही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतात. वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितलेले आहे की आधी अमित शहांचा राजीनामा घ्या, मग आम्ही राजीनामे देतो. तिथून सुरुवात करा. मात्र, अमित शहा आणि मोदींपेक्षा भाजपच्या राजकारणात जास्त काळ घालवलेल्या काही वरिष्ठ मंत्र्यांनी आधी अमित शहांचा राजीनामा घेण्याची अट घातली आहे. “जर फेरबदल करायचे असतील तर, नाहीतर तुम्ही आम्हाला तुमच्या अधिकारात बरखास्त करा किंवा वगळा,” असे त्यांनी म्हटले आहे.