
श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डातील सरकारी हस्तक्षेपाचा फटका अखेर त्यांनाच बसला. पहिली महिला चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेऐवजी आता हिंदुस्थानात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हिंदुस्थानला यजमानपद दिले असून मुंबई आणि वडोदरा येथे 14 ते 28 फेब्रुवारीदरम्यान या टी-20 स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामने खेळवले जातील. श्रीलंकेकडून यजमानपद हिरावले असले तरी पात्रतेच्या जोरावर त्यांना स्पर्धेत स्थान मिळाले आहे. 6 जुलैच्या अंतिम क्रमवारीनुसार श्रीलंका अव्वल सहा संघांमध्ये असल्याने ती स्पर्धेत सहभागी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हिंदुस्थान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे सहा संघ आमने सामने येतील. सर्व संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये 28 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल.
आयसीसीने यजमानपदासाठी बांगलादेश, हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांचा विविध निकषांवर विचार केला. त्यानंतर भारताची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डावर सरकारने नियुक्त केलेली ‘ट्रान्सफॉर्मेशन कमिटी’ कार्यरत आहे. आयसीसी राजकीय हस्तक्षेपातून नियुक्त केलेल्या प्रशासनाला मान्यता देत नसल्याने श्रीलंकेच्या बोर्डाच्या प्रतिनिधींनाही आयसीसीच्या बैठकीपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे यजमानपद गमावण्याची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर डिसेंबर 2022 नंतर आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही, मात्र 2023 मधील महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील सामने तसेच 2025 मधील काही सामने येथे झाले आहेत. वडोदरानेही 2025 आणि 2026 मध्ये डब्ल्यूपीएलचे सामने आयोजित केले आहेत.



























































