
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांत हिंदुस्थानच्या कबड्डी संघाचे नेतृत्व करणारे, ‘शिवछत्रपती’ पुरस्कारप्राप्त आणि चढाईचे हुकमी अस्त्र म्हणून मैदान गाजवणारे राष्ट्रीय कबड्डीपटू तारक राऊळ यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कर्परोगाशी झुंज सुरू होती, अखेर ती झुंज अपयशी ठरली. ते 75 वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी तृप्ती, मुले श्रेयस व शृंगार आणि सुना असा परिवार आहे.
ना. म. जोशी मार्गावरील आल्हाद सेवा मंडळातून कारकीर्द सुरू करणाऱया तारक यांनी सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या व्यावसायिक संघाचे प्रतिनिधित्व केले. उत्पृष्ट खेळाच्या जोरावर त्यांना महिंद्रा अॅण्ड महिंद्रा संघात संधी मिळाली आणि त्यांनी मैदान गाजवले. 1974 मध्ये मुंबई व महाराष्ट्र संघात त्यांची एकाच वेळी निवड झाली. पुढे त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थान संघाचे नेतृत्व केले. 1981च्या जपान सदिच्छा दौऱयात दोन हिंदुस्थानी संघांपैकी एका संघाचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
तारक हे दोन्ही बाजूंनी चढाई करणारे हुकमी खेळाडू होते. त्यांचे पदलालित्य नेत्रसुखद होते. पाय आणि हाताचा अचूक वापर करून गुण वसूल करण्यात त्यांचा हातखंडा होता. बचावातही सहाय्यक म्हणून ते कोणत्याही जागी चपखल बसत. 1979-80 मध्ये त्यांना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे पाच वर्षे कार्यकारी सदस्य म्हणून काम केले.
आज दुपारी दादर चैत्यभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शेकडो कबड्डीप्रेमींसह आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त माया मेहेर, शैला रायकर, जया शेट्टी यांच्यासह कबड्डी क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू, चाहते व नातेवाईक उपस्थित होते.




























































