
गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि महिलांमध्ये अव्वल मानांकित अरिना सबालेंका यांनी दमदार कामगिरी करत तिसऱया फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत दुसऱया फेरीत अल्काराझने पहिला सेट गमावला असला तरी त्यानंतर दमदार पुनरागमन करत विजय मिळवला.
अल्काराझला उशिरा लय सापडली
अल्काराझने पोर्तुगालच्या जेमी फारियाला 4-6, 6-0, 6-3, 6-2 असे हरवून स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश केला. एप्रिलमध्ये उजव्या मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर आपली पहिली स्पर्धा खेळताना अल्काराझला लय पकडण्यासाठी थोडा वेळ लागला. पण पहिला सेट गमावल्यानंतर त्याने झोकात पुनरागमन केले. जागतिक क्रमवारीत 72 व्या क्रमांकावर असलेल्या फारियाने 3-3 अशा स्थितीत पहिला ब्रेक मिळवून जोरदार सुरुवात केली आणि पहिला सेट 6-4 ने जिंकला.
दुसऱया सेटमध्ये अल्काराझचा प्रतिहल्ला
त्यानंतर या स्पॅनिश खेळाडूने दुसऱया सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. आपल्या पहिल्याच सर्व्हिस गेममध्ये ब्रेक पॉइंट वाचवला आणि सलग आठ गेम्स जिंकले. अल्काराझने एका उत्कृष्ट फोरहॅण्ड पासने फारियाची सर्व्हिस ब्रेक केली आणि अवघ्या 33 मिनिटांत दुसरा सेट 6-0 ने जिंकला. अल्काराझने तिसऱया आणि चौथ्या सेटमध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले आणि आत्मविश्वासाने खेळला. त्याने 2 तास 40 मिनिटांत विजय मिळवला आणि 2026 मधील ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमधील आपला 9-0 असा अपराजित विक्रम कायम ठेवला. पुढील फेरीत अल्काराझचा सामना चीनच्या वू यिबिंगशी होईल, ज्याने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थला 7-5, 6-3, 6-1 ने पराभूत केले.
पुरुष गटात अर्जेंटिनाच्या मारियानो नावॉनने नोव्हाक जोकोविचला पराभूत केल्यानंतर आपली विजयी मालिका सुरू ठेवली आणि माटेओ बेरेटिनीला 3-6, 6-3, 6-4, 7-6 (4) असे पराभूत केले. आठव्या मानांकित बेन शेल्टनने ह्युबर्ट हुरकाझला 6-3, 5-7, 7-6 (3), 7-5 असे पराभूत केले,
सबालेंकाची तुफानी खेळी
अरिना सबालेंकाने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत महिला एकेरीच्या स्पर्धेत सहज विजय मिळवून तिसऱया फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित सबालेंकाने बुधवारी रात्री पोलिना इयात्सेन्कोला अवघ्या 53 मिनिटांत 6-1, 6-1 ने पराभूत केले. गेल्या काही स्पर्धांमध्ये तिची कामगिरी चांगली झाली नव्हती, पण यावेळी तिने अशा पॉवर-हिटिंगचे प्रदर्शन केले की असे वाटते की, ती तिच्या मूळ फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले. तिसऱया फेरीत पोहोचलेल्या खेळाडूंमध्ये जेसिका पेगुलाचा समावेश होता. जिने सोफिया केनिनला 6-3, 6-1 असे पराभूत करण्यासाठी फक्त 56 मिनिटे घेतली.




























































