
चीनच्या राष्ट्राध्यक्षांविषयीचा मोठा दावा तिबेटच्या निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान लोबसांग सांगे यांनी केला आहे. त्यांनी शी जिनपिंग यांच्याविषयी अनेक गौप्यस्फोटही केले. लोबसांग सांगे म्हणाले की, जर शी जिनपिंग यांनी चीनमध्ये त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली, तर सत्तापालट होईल.
शी जिनपिंग यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला आहे. आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर केल्यास सत्तापालट होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस, शी जिनपिंग किर्गिझस्तानमध्ये दाखल झाले. विमानातून उतरतानाच्या एका व्हिडिओमध्ये ते पत्नी पेंग लियुआन यांचा हात घट्ट धरून हळूहळू पायऱ्या उतरताना दिसत होते. काहींनी त्यांचा चेहरा फिकट, सुजलेला आणि चाल अस्थिर असल्याचे वृत्त दिले. यामुळे सोशल मीडियावर, विशेषतः तिबेटी, तैवानी आणि परदेशस्थ चिनी समुदायांमध्ये, त्यांची प्रकृती खालावली आहे किंवा त्यांना मदतीची गरज आहे, अशा अटकळींना सुरुवात झाली.या पार्श्वभूमीवर या दाव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
लोबसांग सांगे पुढे म्हणाले, त्यांचा सुजलेला चेहरा बघा, त्यांची चाल बघा. त्यांचे काम निश्चितच आव्हानात्मक आहे, पण या दबावाचा परिणाम होत आहे, म्हणूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मनातील मानसिक तणावामुळे ते धक्कादायक निर्णय घेत आहेत, म्हणूनच ते वरिष्ठ लष्करी जनरल्सना, त्यांनी स्वतः नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना पदावरून दूर करत आहेत. अनेक जनरल्स गायब झाले आहेत, संरक्षण मंत्री गायब झाले आहेत, आणि या लोकांना नियुक्त केले जाते आणि नंतर ते गायब होतात.चीनच्या अंतर्गत वर्तुळाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि लष्करप्रमुख हे चिनी मंत्र्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. शी जिनपिंग एका वेगळ्याच विश्वात जगत आहेत,असेही ते म्हणाले.
चिनी इतिहासात, युवराज तुमची हत्या करून तुमचे स्थान बळकावेल, असा मोठा धोका आहे. पण जर तुम्ही युवराजाची नेमणूक केली नाही, तर तुम्ही तुमचे राज्य कदाचित वाढवू शकाल, पण त्यामुळे देशाची शक्ती क्षीण होईल. यामुळे सत्तालोभी गटांमध्ये संघर्ष निर्माण होईल. देशात यादवी युद्ध भडकेल. हा चीनचा इतिहास राहिला आहे, आणि मला वाटते की म्हणूनच ते उत्तराधिकाऱ्याची घोषणा करत नाहीत,असा दावाही त्यांनी केला.


























































