श्रीनगर विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात; पार्किंगदरम्यान खांबाला धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबईहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान श्रीनगर विमानतळावर पार्किंग करत असताना व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टीमच्या खांबाला धडकले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणीही जखमी झालेले नाही.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E 225 (VT-NOG) शुक्रवारी सकाळी सुमारे 9.02 वाजता बे क्रमांक सहामध्ये पार्क केले जात असताना विमानाचा एका VDGS खांबाला धक्का लागला. या धडकेत विमानाच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या घटनेनंतर विमानतळाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहिले.

या घटनेनंतर मॅन्युअल शिडीच्या साहाय्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्राधिकरणाने सांगितले की, घटनेच्या सभोवतालच्या तथ्यांची आणि परिस्थितीची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यपद्धतीनुसार केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल. विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, या घटनेनंतरही श्रीनगर विमानतळावरील विमानसेवा सामान्य असून विमानांचे आगमन आणि प्रस्थान वेळापत्रकानुसार सुरू आहे.