ऐतिहासिक रंकाळा तलावाला रंगसंगतीचा साज, पाच कोटींचे कारंजे आठवडय़ातील चारच दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक रंकाळा तलावात तब्बल पाच कोटींच्या निधीतून उभारलेला रंगीत-संगीत कारंजा सुरू करण्यास अखेर मुहूर्त लागला आहे. ऑगस्टच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा कारंजा उद्यापासून (दि. 4) नियमितपणे सुरू होत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आठवडय़ात केवळ शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस तेही सायंकाळी दोन वेळा 15-15 मिनिटे असे अर्धा तास विद्युत रोषणाई व ध्वनिप्रणालीसह हे पाण्याचे कारंजे सुरू राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. य कारंजाच्या वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होत आहे.

ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धनासाठी त्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यास प्राथमिकता देण्याऐवजी कोणीही मागणी केली नसताना पाच कोटींच्या निधीतून हा कारंजा बसविण्याचा घाट घातला गेला. काहींनी विरोध करूनसुद्धा त्याला किंमत दिली नाही. तीस ते चाळीस लाखांमध्ये होणाऱया कारंजासाठी तब्बल पाच कोटी रुपये खर्चाची उधळपट्टी होत असल्याचा आरोपही झाला. त्याचीही पर्वा करण्यात आली नाही. काम अर्धवट असतानाच, या कारंजाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या कारंजाबाबत प्रतीक्षा असतानाच, आता महापालिकेकडून हा कारंजा येत्या उद्यापासून (दि. 4) सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आकर्षक विद्युत रोषणाई ध्वनिप्रणालीसह पाण्याचे कारंजे सुरू करण्यात येत आहेत. नागरिक व पर्यटकांना रंकाळा तलावाचे सौंदर्य अनुभवता यावे, यासाठी कारंजे नियमित सुरू ठेवण्यास आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मान्यता दिली आहे. मात्र, सध्या प्रत्येक आठवडय़ात शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस कारंजे सुरू ठेवण्यात येणार आहे.नागरिकांनी या सुविधेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.