शाळेची वाट काट्याकुट्यातून विकास आराखडय़ातील रस्ते गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवळाली प्रवरा, दि. 3 (सा. वा.) – देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत विकास आराखडा आणि भूमिअभिलेखाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले मराठी व माध्यमिक विद्यालयाकडे जाणारे रस्ते प्रत्यक्षात गायब झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने चक्क काटय़ाकुटय़ातून वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. या वाटेवर विद्यार्थ्यांना डुकरे आणि सापांचा सामना करण्याची वेळ येत असून, एखादी अनुचित घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब ढूस व पालकांनी उपस्थित केला आहे.

नगरपालिकेच्या विकास आराखडय़ात तसेच भूमिअभिलेखाच्या नकाशावर शाळेकडे जाणारे रस्ते दाखविण्यात आलेले असताना प्रत्यक्षात हे रस्ते गेले कुठे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून घरे उभारण्यात आल्याची परिस्थिती आहे. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभाग याकडे काणाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने आजपर्यंत विकास आराखडय़ातील या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते मोकळे करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणाच्या विळख्यात कसे गेले, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सुरक्षित रस्ता देणे, ही पालिकेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एखादा विद्यार्थी सापाच्या दंशाला किंवा डुकराच्या हल्ल्याला बळी पडण्याची पालिका वाट पाहणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. पालिकेने तातडीने जागे होऊन नकाशावरचे रस्ते शोधावेत, अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाट उपलब्ध करून द्यावी; अन्यथा या प्रश्नावर नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब ढूस यांनी दिला आहे.