
महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वृक्षांच्या गणनेमध्ये देशी-विदेशी 211 प्रजातींच्या 9 लाख 56 हजार 827 वृक्षांची नोंद झाली आहे. सरासरी क्षेत्रफळाच्या तुलनेत कुपवाडमध्ये सर्वाधिक वृक्ष आहेत. शहर हरित क्षेत्र होण्यासाठी क्षेत्रफळाच्या आकडेवारीनुसार 33 टक्के हरित क्षेत्र असणे आवश्यक आहे. पण, मनपा क्षेत्रात केवळ 20 टक्केच हरित क्षेत्राची नेंद झाली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात तीन वर्षांत 1 लाख वृक्ष नव्याने लावण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. पहिल्या वर्षात 25 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना नसल्याने वृक्षांच्या प्रजाती, आयुष्यमान, देशी-विदेशी झाडे याची माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे वृक्षांच्या गणनेसाठी प्रशासनाकडून अनेकवेळा प्रयत्न झाले होते. वृक्षगणनेसाठी 2020-21च्या दरम्यान निविदा मागवल्या होत्या. प्रतिवृक्ष 5 रुपये दराने वृक्षांची गणना सुरूही झाली. वृक्षाची प्रजात, घेर व अन्य माहिती संकलित करून नमुन्यात भरायची होती. हे काम 5 रुपयांत परवडेना म्हणून ठेकेदाराने काम सोडले होते. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 13 जानेवारी 2025 रोजी मुंबईच्या एका एजन्सीची नेमणूक झाली आणि वृक्षगणनेला सुरुवात झाली होती. सध्या गणना पूर्ण झाली असून, महापालिका क्षेत्रात सध्या वृक्षांची संख्या 9,56,827 आहे.
यामध्ये एकूण 211 प्रजातींची झाडे आहेत. त्यात देशी झाडे 4 लाख 90 हजार 786, तर विदेशी झाडे 4 लाख 66 हजार 41 आहेत. पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, शिसव, शिरीष, आंबा, चिंच, करंज, बाभूळ, सुबाभूळ, अशोक, कांचन, जांभूळ, उंबर, आपट, सप्तपर्णी, पेल्टोफोरम, निलगिरी आदी प्रकारचे वृक्ष आहेत. महापालिकेच्या एकूण 118.18 चौ.कि.मी. क्षेत्रापैकी सुमारे 20.71 टक्के भाग वृक्षांनी आच्छादित आहे. हे प्रमाण किमान निकष पूर्ण करत असले तरी 33 टक्के हरित क्षेत्र असणे आवश्यक आहे. कुपवाड शहरात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वृक्षांची गणना झालेली आहे.
20 वर्षांत 8 लाख झाडे वाढली
महापालिका क्षेत्रातील झाडांनी आतापर्यंत 1 लाख 57 हजार 808 टन कार्बनडायऑक्साईड शोषून घेतला आहे. ही प्रक्रिया कार्बन स्थिरीकरण म्हणून ओळखली जाते. यामुळे तापमानवाढ आणि हवामान बदलाचा धोका कमी करण्यास मदत होते. महापालिकेला आता कार्बन क्रेडिट मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. महापालिका क्षेत्रात 140 ते 150 वर्षांपर्यंतची झाडे आढळतात. यामध्ये प्रामुख्याने गोरखचिंच, वडाच्या झाडांचा समावेश आहे. 100 वर्षांवरील आणि त्याखालील विविध वयोगटांतील लाखो झाडे शहराच्या जैवविविधतेला बळकटी देत आहेत. विशेष म्हणजे, 20 वर्षांत 8 लाख 44 हजार झाडांची वाढ झाल्याचे चित्र दिसते.
वृक्षतोडीवर नियंत्रण आवश्यक
महापालिका क्षेत्रात वृक्ष संवर्धनाला अधिक वेग देण्याची गरज आहे. तीन वर्षांत 1 लाख झाडे लावण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे. 2025-26 मध्ये 33 हजार झाडांचे लक्ष्य होते, त्यापैकी 24 हजार 600 झाडांची लागवड झाली आहे. उर्वरित दोन वर्षांत आणखी 75 हजार वृक्षांची लागवड करण्याचा उद्देश मनपाचा आहे. पण लागवडीबरोबर वृक्षांचे जतन करणे आवश्यक आहे. वृक्षांची संख्या वाढत असताना पहिली कुऱहाड वृक्षांवर पडते. दरवर्षी वृक्षलागवडही होत असते. त्यावर मोठा खर्चही केला जातो. मात्र, वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.


























































