
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांना गुरुवारी सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या थेट निर्देशानुसार बीडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाने न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून या आदेशाची अंमलबजावणी केली. प्रत्यक्ष कामकाज सुरू असतानाच झालेल्या या अचानक कारवाईमुळे संपूर्ण न्यायालयीन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
न्यायालयीन कार्यपद्धतीत न्यायालयीन शुचिता राखण्याच्या उद्देशाने अपवादात्मक स्थितीत अशा प्रकारची कारवाई केली जाते. गुरुवारी सकाळच्या सत्रात डॉ. रचना तेहरा यांनी आगामी राष्ट्रीय लोकअदालतीच्या पूर्वतयारीसाठी सर्व न्यायाधीश, भूसंपादन अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली होती. ही बैठक संपवून त्या आपल्या नेहमीच्या कामकाजासाठी न्यायालयात बसल्या असता बीडहून आलेल्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाने त्यांच्या दालनात जाऊन थेट सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या आदेशांची अंमलबजावणी केली.
या नाट्यमय घडामोडीमुळे अंबाजोगाई न्यायालयातील १५ वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ज्या दालनात डॉ. तेहरा यांच्यावर ही कारवाई झाली, त्याच कक्षात सुमारे दीड दशकापूर्वी तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांवरही अशाच प्रकारे सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली होती. एकाच कक्षात घडलेल्या या पुनरावृत्तीमुळे स्थानिक वकिलांमध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात दिवसभर या कारवाईची चर्चा सुरू होती.

























































