
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा अंतिम उपाय नव्हे. नैराश्य आले तर बोला. निःशब्दता नको तर संवाद हवा, भीती नको तर समजून घेणे हवे – विचारपूस हवी. सोबत योग्य समुपदेशन, उपचार हवेत… कारण जीवन सुंदर आहे, ते सुंदर जगूया. हा संदेश देणारा जनजागृतीपर कार्यक्रम आज चर्चगेट येथील निर्मला निकेतन येथे पार पडला. या कार्यक्रमात आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या, पण प्रयत्नांती आत्महत्येच्या विचारांवर मात करणाऱ्या व्यक्तींनी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध महिना म्हणून पाळला जातो. मानसिक आरोग्याविषयी जगजागृती करणे आणि आत्महत्या रोखणे हा यामागचा हेतू असतो. निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स चर्चगेट येथे ‘आत्महत्येची कथा बदलूया – एक प्रश्न विचारा, एक जीव वाचवा’ हा विशेष परिसंवाद झाला. दीपज्योती इंडिया फाऊंडेशन, अनकही, द कनेक्ट हट, कलर पॉझिटिव्ह तसेच डब्ल्यूआयसीसीआय – होलिस्टिक चाईल्ड डेव्हलपमेंट काऊन्सिल, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने परिसंवाद झाला. दीपज्योती इंडिया फाऊंडेशनच्या संस्थापिका तराना दीपज्योती गर्ग आणि सहसंस्थापक अशोक गर्ग यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.
स्वतःला हानी करू नका…
परिसंवादात मानसिक आरोग्य तज्ञ रश्मी सुंदरम, ट्रान्सवुमन कायनात खान आणि योगी रानी तसेच सनी रॉडर्स आणि दिशांत टाक यांनी सहभाग घेतला. योगी रानी यांनी आयुष्यात तीन वेळा आत्महत्येचे प्रयत्न केल्याचे सांगितले. कायनात खान यांनी ‘स्वतःला त्रास करू नका, तुम्हाला त्रास देणाऱ्यांना त्रास द्या,’ असा सल्ला दिला. मनातील भीती दूर करा, असे मार्गदर्शन सनी रॉडर्स आणि दिशांत टाक या युवकाने केले. यावेळी अनुपमा कोटीयनकर, विकीच्या अन्वेषा, कलर पॉझिटिव्हचे सॅविओ, डॉ. सचिन, सिस्टर नोएला उपस्थित होत्या.
दरवर्षी 1.7 लाख व्यक्तींच्या आत्महत्या
दुसऱ्या परिसंवादात मानसोपचार आणि समुपदेशाच्या अंगाने विचार मांडण्यात आले. यामध्ये मोना डॉक्टर, सचिन चिदंबरम, डॉ. सीथारमन अय्यर यांनी सहभाग घेतला तर त्यांना बोलते केले लिझा पेस यांनी. आपल्या देशात दरवर्षी सुमारे 1 लाख 70 हजार व्यक्ती नैराश्यातून आपले जीवन संपवत आहेत. त्यापैकी किती जणांना तुम्हाला काही मदत हवी का, असा प्रश्न विचारला गेला, असा मुद्दा परिसंवादात उपस्थित करण्यात आला.




























































