FBI च्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीचे नाव; आर्थिक फसवणुकीचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील सरकारी योजनेतील कथित गैरव्यवहारात सहभागी असल्याबद्दल एफबीआयने (FBI) हिंदुस्थानी वंशाच्या मनजीत सिंग बेदी याचे नाव आपल्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट केले आहे.

एफबीआयच्या माहितीनुसार, बेदी वॉशिंग्टनच्या टाकोमा येथे एक छोटे किराणा दुकान चालवत होता आणि सप्लिमेंटल न्युट्रीशन असिस्टंस प्रोग्राम (SNAP) अंतर्गत ग्राहकांना अन्नधान्याऐवजी रोख पैसे देण्यासाठी त्यांची सरकारी कार्डे स्वाइप करत होता.

योजनेच्या लाभार्थ्यांना अन्नधान्य विकण्याऐवजी, बेदी कथितरीत्या त्यांची ‘इलेक्ट्रॉनिक बेनिफिट ट्रान्सफर’ (ईबीटी) कार्डे स्वाइप करायचा आणि त्या बदल्यात मिळणाऱ्या पैशांमधील अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवून उरलेली रक्कम त्यांना रोख द्यायचा, असे एफबीआयने गुरुवारी सांगितले.

एफबीआयने दावा केला आहे की, अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेल्या बेदीने मार्च २०२४ ते जून २०२५ दरम्यान अमेरिकन सरकारची किमान ६ लाख अमेरिकन डॉलर्सची फसवणूक केली.

बेदी टाकोमामध्ये ‘एशियन ग्रॉसरी स्टोअर’ नावाचे एक छोटे किराणा दुकान चालवत होता. तो तिथे ‘स्नॅप’ (SNAP) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या ईबीटी कार्डद्वारे अन्नधान्य विकत असल्याचे दाखवत होता.

‘त्याला अटक करण्यासाठी आणि शिक्षा होण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती देणाऱ्याला १,५०,००० अमेरिकन डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे’, असे एफबीआयने म्हटले आहे.

वायर फ्रॉड आणि स्नॅप योजना फसवणुकीचे आरोप निश्चित झाल्यानंतर बेदीला अटक न करता न्यायालयात हजर राहण्याची मुभा देण्यात आली होती.

त्याला आपला पासपोर्ट जमा करण्याचा आणि वॉशिंग्टन राज्यातच राहण्याचा आदेश देण्यात आला होता.

मात्र, बेदी रस्ते मार्गे सीमा ओलांडून कॅनडात गेला आणि तिथून तो हिंदुस्थानात पळून गेला, असे एफबीआयने सांगितले.

निगराणीच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर २१ मे रोजी अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात बेदीविरुद्ध फेडरल अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.