
मन, हृदय नसलेल्या निर्दयी सरकारला उपोषणाने फरक पडत नाही. तुमच्या जिवाचे होणारे हाल सत्ताधाऱयांना दिसत नाहीत. उपोषण सोडा आणि सरकारला हलवणारे राज्यव्यापी आंदोलन उभारा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केले. शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशीही पाठिंब्यासाठी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत सर्पदंश, विषबाधेसह विविध कारणांनी सुमारे 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. भ्रष्ट, अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी नाशिक येथे 18 ऑगस्टपासून राहुल पावरा, विवेक गावीत, लक्ष्मी जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन पाठिंबा दिला. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असताना सरकार दखल घेण्यास तयार नाही. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सर्व मागण्या, प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली, चर्चा करून आश्वासित केले. उपोषणामुळे तुमचे हाल होत आहेत, सरकारला त्याचा फरक पडत नाही. त्रास करून न घेता उपोषण मागे घ्या, अशी माझी विनंती आहे. मात्र अंतिम निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे, असे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. मांसाहार-शाकाहार वादाचा त्रास होणाऱया या निर्दयी सरकारला मन, हृदय नसल्याने त्यांच्यासमोर उपोषण करून फायदा नाही. सत्ताधाऱयांना हलवण्यासाठी तुमच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभारा. शिवसेनेचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील. राहुल गांधी यांनी पाठिंबा दिलाच आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष तुमच्या पाठीशी उभे करू, असेही स्पष्ट केले.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अनागोंदी सुरू आहे. विद्यार्थी, लाडक्या बहिणी, मराठा, ओबीसी, धनगर यांच्यासह सर्वच समाजाकडून आंदोलने होत आहेत. जनता जागृत होत असून 2029 ला भाजप सत्तेवर राहणार नाही, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
या वेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, सचिव सूरज चव्हाण, माजी आमदार वसंत गीते, अनिल कदम, महापालिका गटनेते केशव पोरजे, लोकसभाप्रमुख जयंत दिंडे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते उपस्थित होते.
राजभवनावर आंदोलनासाठी पाठिंबा द्या
सर्व विरोधी पक्ष पाठीशी उभे राहणार असतील तर उपोषण मागे घेऊ. त्यानंतर राजभवनावर जाऊन आंदोलन करू, त्यासाठी पाठिंबा द्या, असे आंदोलकांच्या प्रतिनिधीने सांगितले.
हजारो कोटींचा निधी जातो कुठे – दीपके
कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही नाशिकमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जनावरे सुद्धा राहू शकणार नाहीत इतकी दैन्यावस्था आदिवासी आश्रमशाळांची झाली आहे, आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी जातो कुठे, असा सवाल दीपके यांनी केला. सरकारला तुमच्या जीवाची पर्वा नाही, उपोषण सोडून मुंबईत मोठे आंदोलन करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.



























































