
>> गजानन चेणगे
महाराष्ट्राला वरदायी ठरलेले कोयना धरण आज शंभर टक्के भरले. त्यामुळे वीज निर्मितीसह सिंचनाची चिंता मिटली आहे. ‘सुपर अल निनो’मुळे यंदा कोयना धरण भरेल की नाही अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, गतवर्षीपेक्षा सतरा दिवस आधीच कोयना पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आजअखेर तब्बल 25.35 टीएमसी पाणी विनावापर सोडून देण्यात आले.
पावसाळय़ापूर्वी ‘सुपर अल निनो’च्या धास्तीने तोंडचे पाणी पळाले होते. त्यात जून सरला तरी पावसाचा पत्ता नव्हता. कोयना धरणातील पाणीसाठय़ाने तळ गाठला होता. 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात केवळ 8.69 टीएमसी पाणीसाठा उरला होता.
जुलै महिन्यात सातारा जिह्याच्या पश्चिम भागात धुवाँधार पाऊस कोसळला. त्यामुळे कोयनेसह सर्वच धरणांच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ झाली. धरणातून पाणी सोडले नसते, तर कोयना धरण केव्हाच भरले असते.
127.68 टीएमसी पाण्याची आवक
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी असून, या पावसाळ्यात धरणामध्ये प्रत्यक्षात 127.68 टीएमसी पाण्याची आवक झाली. आजअखेर धरण परिचालन सूचीनुसार धरणातून 25.35 टीएमसी पाणी विनावापर सोडून देण्यात आले. अखेर आज कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील पाणीसाठय़ाने शंभर टक्क्यांचा टप्पा गाठला. गतवर्षी हा शंभर टक्केचा टप्पा गाठण्यास 20 सप्टेंबर 2025 हा दिवस उजाडावा लागला होता. त्याआधी 17 दिवस आधीच धरण 100 टक्के भरले.
दोन वक्र दरवाजे उघडले
आजही कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयनानगर, नवजा व महाबळेश्वर परिसरात समाधानकारक पर्जन्यवृष्टी सुरू असून, धरणात प्रतिसेकंद 7737 क्युसेक पाण्याची आवक होते आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दोन वक्र दरवाजे आज रात्री नऊ वाजता एका फुटाने उघडून त्याद्वारे 3,182 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून, त्याद्वारे 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तो मिळून कोयना नदीमध्ये एकूण 4,232 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.




























































