
मुंबई महापालिकेत बदल्यांचे ‘रेट कार्ड’ हा मुद्दा गाजत असतानाच पालिका अभियंत्यांच्या बदल्या आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने 2 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार एकच खाते किंवा विभागात सलग तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांची बदली दरवर्षी 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अभियंत्यांना महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा आणि सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्या ‘ऑनलाइन’ पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रक्रियेसाठी संबंधित अभियंत्यांना 5 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून बदलीसाठी प्राधान्यक्रम सादर करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना किमान एक आणि कमाल पाच प्राधान्यक्रम देण्याची मुभा असेल. ऑफलाइन पद्धतीने प्राधान्यक्रम स्वीकारले जाणार नाहीत.





























































