चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी… पालिका शाळेत आता ‘अलार्म’ लावलेली अग्निशामक यंत्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या शाळांमध्ये बसवण्यात येणारी आगीची सुरक्षा यंत्रणा चोरीला जाऊ नये किंवा गहाळ होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. या यंत्रांना चोरीविरोधी अलार्म सिस्टीम जोडली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही अनधिकृत व्यक्ती हे यंत्र हलवण्याचा किंवा चोरण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा लगेच अलार्म वाजून परिसर सतर्क होईल.

पालिका शाळांमध्ये आता सुरक्षेचा डबल डोस मिळणार असून ‘चोरीविरोधी अलार्म यंत्रणे’सह 500 मिली क्षमतेची पोर्टेबल जेल आधारित अग्निशामक यंत्रे बसवली जाणार आहेत. या कामाच्या पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी शिक्षण विभागाने अधिकृत ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांसारख्या सार्वजनिक ठिकाणी आगीच्या आपत्कालीनप्रसंगी तातडीने उपाययोजना व्हावी, या उद्देशाने 500 मिली जेल आधारित यंत्रे निवडण्यात आली आहेत. मात्र, अनेकदा अशी लहान उपकरणे चोरीला जाण्याची किंवा हलवली जाण्याची शक्यता असते. यावर मात करण्यासाठी या यंत्रांना चोरीविरोधी अलार्म सिस्टीम जोडली जाणार आहे.

– कामात चोरीविरोधी यंत्रणेसह 500 मिली जेल आधारित पोर्टेबल अग्निशामक यंत्रांचा पुरवठा, स्थापना, चाचणी व कार्यान्वयन याचा समावेश आहे. यावर साधारणतः तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च केला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात या संबंधित निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल.

– पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासोबतच सरकारी मालमत्तेचे चोरीपासून रक्षण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.