
बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 70 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागातील दोन लोकसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तडजोडीनंतर 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मनपाचा कामगार विजय पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुय्यम अभियंता नीरवकुमार जैसूर यालाही ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार हे बेकरीचा व्यवसाय करतात. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी कामगार विजय पाटील याने स्वतःसाठी तसेच दुय्यम अभियंता नीरवकुमार जैसूर यांच्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 2 सप्टेंबरला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या पडताळणीवेळी विजय पाटील याने 70 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराची दुय्यम अभियंता नीरवकुमार जैसूर यांच्याशी भेट घडवून आणण्यात आली. यावेळी तडजोडीनंतर जैसूर यांनी 60 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले.
के/पश्चिम वॉर्ड कार्यालयातील तळमजल्यावरील लिफ्टजवळ विजय पाटील याला तक्रारदाराकडून 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर दुय्यम अभियंता नीरवकुमार जैसूर यांना त्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान जैसूर यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल पह्न जप्त करण्यात आले. विजय पाटील यांच्या अंगझडतीत एक मोबाईल पह्न आणि 40 हजार 820 रुपये रोख मिळाले. तसेच त्याच्या बॅगेत 2 लाख 37 हजार 600 रुपये रोख रक्कम आढळून आली.




























































