खवड्या डोंगर घटनेची पुनरावृत्ती, धाराशिव हादरले; आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी, मायलेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशीव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरच्या घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाले. आईने आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्याच्या उंच भागातून खाली उडी घेतली. या दुर्घटनेत आईसह एका चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बंताळा येथील रहिवासी अश्विनी तानाजी मोहिते (३०) या गुरुवारी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. किल्ल्याच्या उंच तटबंदीच्या परिसरात असताना त्यांनी तिन्ही मुलांसह खाली उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या दुर्घटनेत अश्विनी मोहिते आणि त्यांच्या एका चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नळदुर्ग किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्था आणि धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किल्ल्यावर पर्यटकांची मोठी वर्दळ असताना अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच घटनेचे संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहे