
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात कारवाईचा धडाका लावला आहे. प्रशानाने गेल्या तीन महिन्यांत उसळीपासून औषधांपर्यंत घेतलेल्या तब्बल 32 हजार 600पैकी 15 हजार 268 नमुन्यांत भेसळ असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत उघड झाले आहे.
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एफडीएने राबवलेल्या तपासणी मोहिमेतून राज्यभरातून 34 हजार 584 अन्न नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी 30 हजार 492 नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणीत 15 हजार 332 नमुने प्रमाणित, तर तब्बल 15 हजार 160 नमुने अप्रमाणित ठरले. म्हणजेच तपासणी झालेल्या अन्न नमुन्यांपैकी जवळपास निम्मे नमुने दर्जाच्या कसोटीवर अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या गुणवत्तेवरही प्रशासनाने लक्ष पेंद्रित केले आहे. या कालावधीत 3 हजार 20 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 2 हजार 112 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून यात आठ बनावट, 93 अप्रमाणित दर्जाचे आणि सात चुकीचे लेबल असलेले नमुने आढळले आहेत.
राज्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पुण्यातील आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेतही अन्न नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. या प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली असून निकृष्ट, बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीचे लेबल असलेले नमुने आढळताच संबंधित उत्पादक, वितरक, विव्रेते आणि इतर संबंधितांविरोधात कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
तपासणीचा वेग चारपटीने वाढला
प्रयोगशाळांमधील नमुना तपासणीच्या प्रमाणात यंदा मोठी वाढ झाली आहे. 2025-26मध्ये दरमहा सरासरी 3 हजार 967 नमुने तपासणीसाठी घेतले जात होते, तर सरासरी 2 हजार 760 नमुन्यांची तपासणी पूर्ण होत होती. यंदा जून ते ऑगस्टदरम्यान दरमहा सरासरी 12 हजार 534 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 10 हजार 868 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी निकृष्ट, बनावट, भेसळयुक्त किंवा नियमबाह्य उत्पादने आढळल्यास संबंधित उत्पादक व वितरण व्यवस्थेतील व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन




























































