
राज्यात मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे आरक्षणासाठी मागील सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती आज खालावली आहे. त्यामुळे मराठवाडय़ातील संतप्त मराठा बांधवांनी बुधवार आणि गुरुवारी मराठवाडाभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. काही ठिकाणी टायर जाळून ‘रास्ता रोको’ आंदोलन, तर अनेक ठिकाणी टॉवरवर चढून आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. मराठवाडय़ातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड. हिंगोली, धाराशीव, लातूरसह नांदेडात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
अहमदपूरला पारंपरिक खेळ खेळत रास्ता रोको करण्यात आला. लातूर जिह्यात अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद होती. हिंगोली जिह्यातील वसमत येथे आज गुरुवारी आमदारांच्या निषेधार्थ प्रतीकात्मक ‘तिरडी आंदोलन’ करत निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्हय़ातील वडवणी येथे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले तर आष्टीत दुग्धाभिषेक करण्यात आला तर गेवराईतील तरुणांनी मोटरसायकल रॅली काढली. परभणी जिल्हय़ात आवश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले. धाराशीवमध्ये बंदला प्रतिसाद मिळाला.
छत्रपती संभाजीनगर,जालन्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री रत्नपूर आदी तालुक्यात मराठा समाजबांधव आक्रमक झाले आहेत. जालना जिह्यातील जाफराबाद मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बंदला गुरुवारी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला.
मराठा आरक्षणासाठी धाराशीवमध्ये युवकाची आत्महत्या
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने युवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आठवडाभरात लोहा, सेलू, पंळबमध्ये युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. यादरम्यान नायगाव तालुक्यातील खैरगाव येथील प्रताप शंकरराव शिंपळे या 20 वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रात्री घडली.





























































