इंजिनीअरिंग ‘सीईटी’ परीक्षेत पर्सेंटाईल घोटाळा! विद्यार्थ्यांचा डाटा लीक, खासगी कन्सल्टिंगकडून हमखास ऍडमिशन, हजारो गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘एमएच-सीईटी’ परीक्षेत बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांचा डाटा लीक करून कोटय़वधींचा घोटाळा केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामध्ये खासगी कन्सल्टिंग संस्था, क्लासेस, एजन्सी विद्यार्थ्यांना संपर्क करून उच्च पर्सेंटाईल आणि नामांकित कॉलेजमध्ये हमखास ऍडमिशन मिळवून देत आहेत. यासाठी प्रतिविद्यार्थी 10 ते 20 लाख रुपयांचा व्यवहार होत आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने ते हतबल आहेत. याबाबत सबळ पुराव्यांसह आझाद मैदान पोलीस ठाण्यात विद्यार्थी-पालकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इंजिनीअरिंग परीक्षेसाठी ‘सीईटी’ सेलकडून प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन पर्सेंटाईल जाहीर केले जातात. यानुसार विद्यार्थ्यांना मुंबईतील व्हीजेटीआय, आयसीटी आणि पुण्यातील सीओईपी, पीआयसीसारख्या सरकारी मोठय़ा कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. या ठिकाणी 98 ते 99 पर्सेंटाईलचे मेरिट लागते. मात्र हे पर्सेंटाईल मिळवून देणारी टोळीच सध्या महाराष्ट्रात सक्रिय आहे. सीईटी सेलकडे विद्यार्थ्यांची नोंद असणारा डाटा कुणालाही दिला जात नाही. मात्र हा डाटा 10 हजार रुपयांत लीक होत असल्याचे पुरावे तक्रारदार विद्यार्थी-पालकांकडे आहेत. या गंभीर प्रकाराबाबत तक्रारदारांनी सीईटी सेल आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी संपर्क साधला असता त्यांनी सर्व गोष्टी फेटाळून लावल्या. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले, मात्र याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत तक्रारदार नारायण शिनगारे – बीड, पालक संदीप परब – बोरिवली आणि अमोल अंदुरे – अहिल्यानगर यांनी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या वतीने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

‘व्यवहारा’चे ऑडिओ, व्हिडीओ

विद्यार्थ्यांचा डाटा मिळाला की त्यांना खासगी संस्था, कन्सल्टिंग एजन्सी फोन करतात. तुमचे सीईटी गुण वाढवून देऊ, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ अशा प्रकारचे ऑडिओ-व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याची गॅरंटीचे आमिषही विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

‘सेटिंग’साठी जिल्ह्याबाहेरील केंद्रे

सीईटी परीक्षा केंद्रांचा अभ्यास केला असता मुंबई, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि राज्याबाहेरील विद्यार्थी सीईटी परीक्षा देण्यासाठी गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर व विदर्भातील दूरच्या जिल्ह्यांमध्ये गेल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या भागातील सेंटर नक्कीच मॅनेज असल्याचे समोर येते, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

फॉरेन्सिक तपासणी करा

घोटाळा करून नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवले जात असल्यामुळे संबंधित कॉलेजच्या ऍडमिशन प्रक्रियेची चौकशी करा, दहावी-बारावीचे गुण आणि पर्सेंटाईल तपासा आणि प्रवेशानंतरच्या परीक्षेचे रेकॉर्डही तपासा, संशयित केंद्रांची तपासणी करा, हा प्रकार संघटित गैरव्यवहाराचा असल्याने सर्व पुरावे तपासा आणि कायदेशीर व फॉरेन्सिक तपासणी करा, अशी मागणीही तक्रारदारांनी केली आहे.

असा आहे आक्षेप

परीक्षा दिलेल्या चार हजार विद्यार्थ्यांचा अभ्यास केला असता ज्या विद्यार्थ्यांना 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना दहावीत 75 टक्क्यांपेक्षा कमी तर बारावीमध्ये 65 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत.

या वर्षी अशा विद्यार्थ्यांची संख्या 2 हजारांवर आहे. त्यामुळे या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हा घोटाळा करण्यासाठी 4 हजार विद्यार्थ्यांचा संपूर्ण डाटा लीक झाल्याचे पुरावेही तक्रारदारांनी पोलिसांना दिले आहेत.