ISRO satellite launch: इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! EOS-05 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज अंतराळात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज 4 सप्टेंबर 2026 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून जीएसएलव्ही-एफ15 / ईओएस-05 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणात जीएसएलव्ही रॉकेटने अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस-05 याला अत्यंत अचूकतेने उप-भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (सब-जीटीओ) प्रस्थापित केले.

इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, जीएसएलव्ही यानाने प्रगत भू-प्रतिबिंबन उपग्रह ईओएस-05 ला निर्धारित कक्षेत अचूकतेने प्रस्थापित केले आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 36 हजार किलोमीटर उंचीवरून देशाचे अखंड आणि विहंगम दृश्य प्रदान करण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे. जीएसएलव्ही-एफ15 रॉकेट मोहिमेचे संचालक थॉमस कुरियन यांनी माहिती दिली की, जीएसएलव्हीद्वारे जीटीओ किंवा सब-जीटीओ कक्षेत प्रक्षेपित केलेला हा आतापर्यंतचा सर्वात जड उपग्रह ठरला आहे. जीएसएलव्हीने आपली 19 वी मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली असून, हा उपग्रह जवळजवळ रिअल-टाइम इमेजिंग करण्यास सक्षम आहे. या काही मिनिटांच्या प्रत्यक्ष प्रक्षेपणामागे अनेक महिने आणि वर्षांची अथक मेहनत असल्याचे त्यांनी नमूद केले.

GSLV-F17 हे प्रक्षेपण यान 51.7 मीटर उंच असून त्याचे प्रक्षेपणावेळचे वजन 420.5 टन आहे. त्यामुळे देशाच्या कार्यरत प्रक्षेपण यानांपैकी हे एक सर्वांत मोठे यान ठरते.या यशावर प्रतिक्रिया देताना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे कौतुक केले आणि हिंदुस्थानची अंतराळ क्षमता जागतिक स्तरावर अधिक मजबूत होत असल्याचे सांगितले.