आम्ही विद्यार्थ्यांची ए टीम, शिक्षणाच्या मुद्द्यांवर आमचा भर – अभिजीत दिपके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपली संघटना काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप गुरुवारी फेटाळून लावला. आमचा भर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण कोणत्या राजकीय पक्षासाठी ‘बी टीम’ म्हणून काम करतो, असा आरोप करणाऱ्यांनी आधी आपण कोणाची ‘बी टीम’ आहोत हे ठरवावे, असा टोला दिपके यांनी लगावला. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मी काँग्रेसची बी टीम आहे, तर काही जण मी आम आदमी पक्षाची बी टीम असल्याचे म्हणतात. या सर्वांनी एकत्र बसून आधी मी नेमका कोणाची बी टीम आहे, हे ठरवावे. आमच्या मते, आम्ही विद्यार्थ्यांची ‘ए टीम’ आहोत,” असे दिपके म्हणाले.

सरकारी शाळांमध्ये सुधारणा करण्याची मोहीम ही कोणत्याही एका राजकीय संघटनेची नसून मुलांच्या आणि संपूर्ण देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे ज्यांना वाटते त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिक्षणाच्या प्रश्नांवर विविध राजकीय पक्षांचे नेते काम करत असल्याचे दिपके यांनी नमूद केले. “केवळ आम आदमी पक्षच नाही, तर शिवसेनाही यावर काम करत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिक्षणाच्या प्रश्नांवर काम करत आहेत. शाळांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

शिक्षणाशी संबंधित मोहिमांना भाजपकडून आक्षेप का घेतला जातो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारी शाळांच्या सुधारणेचा मुद्दा कोणत्याही एका संघटनेपुरता मर्यादित ठेवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींच्या शैक्षणिक पात्रतेचीही सार्वजनिकपणे छाननी झाली पाहिजे, असे दिपके यांनी म्हटले. सार्वजनिक जीवनातील कोणत्याही व्यक्तीच्या पदवीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आणि संबंधित व्यक्तीने आपली पदवी तसेच शैक्षणिक पात्रता सार्वजनिक ठेवण्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

विशेषतः निवडणुका लढविणारे आणि घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनी आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबत पारदर्शक राहणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे दिपके यांनी सांगितले.