
तिबेट सीमेजवळ हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर आलेल्या महापुराच्या नऊ दिवसांनंतर त्रिशुली 3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून दोन कामगारांना सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या चमत्कारिक सुटकेमुळे बोगद्यांमध्ये अजूनही अडकलेल्या इतर कामगारांना जिवंत बाहेर काढण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक टीव्ही वाहिन्यांवरून त्रिशुली 3ए जलविद्युत प्रकल्पातील चिखलाने माखलेल्या कामगारांना बचावकर्ते खांद्यावर उचलून बाहेर आणत असल्याची दृश्ये दाखवण्यात आली. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजा राम बसनेत यांनी या बचावकार्याची अधिकृत माहिती दिली. या घटनेनंतर नेपाळचे खासदार राम न्यौपाने यांनीही या बचावकार्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये ‘नेपाळ विद्युत प्राधिकरणा’तील (NEA) मेकॅनिकल फोरमन संजय शहा आणि प्रकल्पाचे पर्यवेक्षक कबीर महाराजन यांचा समावेश आहे.
नेपाळमध्ये पुरामुळे उद्भवलेली परिस्थिती अत्यंत गंभीर असून जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील 12 जलविद्युत प्रकल्पांमधील अंदाजे 900 कामगार बेपत्ता असून, असून, त्यातील सुमारे 500 कामगार अजूनही विविध बोगद्यांमध्ये अडकल्याची मोठी भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळमधील या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या आकडेवारीनुसार, 26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 1290 जणांनी आपला जीव गमावला असून 5 हजारांपेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. या पुराचा फटका चीनच्या सीमावर्ती भागालाही बसला असून, तिबेटच्या बाजूला 21 जणांचा मृत्यू झाला आहे तर 541 नागरिक अजूनही बेपत्ता असल्याचे चीन सरकारकडून सांगण्यात आले आहे.




























































