
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांवर केलेल्या दुहेरी हल्ल्यात 25 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पहिला हल्ला झियारत क्रॉसजवळ पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करून करण्यात आला. दुसरा हल्ला सुरबच्या हाजिका भागात केल्याचा दावा बीएलएने केला आहे.
बीएलएच्या म्हणण्यानुसार, पहिला हल्ला झियारत क्रॉसजवळ पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करून करण्यात आला. या हल्ल्यात ताफ्यातील दोन वाहने नष्ट झाली असून 18 सुरक्षा कर्मचारी ठार झाले. पाच जखमी सैनिक पळून जाण्यात यशस्वी झाले असून हल्लेखोरांनी शस्त्रेही जप्त केली, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दुसरा हल्ला सुरबच्या हाजिका भागात झाला. बीएलएच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसटीओएसने तेथे रिमोट-कंट्रोल वाहनाचा स्फोट घडवला. या हल्ल्यात सात सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बीएलएने झियारत क्रॉसवरील हल्ल्यात आपल्या फतेह स्क्वॉडचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. या संघटनेने दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
दरम्यान, या हल्ल्यांमध्ये 25 पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. बीएलएने यापूर्वी पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने सैनिकांच्या मृत्यूचा दावा केला आहे.


























































