
एल निनोची स्थिती अधिक तीव्र होत असून, आगामी काही महिन्यांत त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी 2027पर्यंत एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता जवळपास 100 टक्के आहे, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने (WMO) व्यक्त केला आहे. त्यामुळे जगातील अनेक भागांमध्ये तापमान आणि पावसाच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता असून, पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांचा धोका वाढू शकतो.
WMOच्या महासचिव सेलेस्टे साऊलो यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, एल निनोची स्थिती सध्या स्पष्टपणे निर्माण झाली असून ती आगामी काळात आणखी मजबूत होईल. दुष्काळ आणि पुरामुळे अनेक भागांमध्ये आधीच परिस्थिती गंभीर झाली आहे. एल निनो अधिक तीव्र झाल्यास या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
एल निनो ही समुद्र आणि वातावरणातील नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा वाढल्यास त्याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. यामुळे काही भागांत अतिवृष्टी, तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच उष्णतेच्या लाटांचा आणि विक्रमी तापमानाचा धोका वाढतो.
एल निनोची तीव्रता मोजण्यासाठी विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील Nino 3.4 भागातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा तीन महिन्यांचा सरासरी फरक पाहिला जातो. अलीकडच्या महिन्यांत या भागातील तापमान झपाट्याने वाढले आहे. मे ते जुलैदरम्यान ते सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते, तर जुलैमध्ये ही वाढ 2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचली. त्यामुळे एल निनो वेगाने बळावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगभरातील हवामानावर परिणाम
यंदा युरोपमध्ये गेल्या काही दशकांतील सर्वाधिक उष्ण उन्हाळ्यांपैकी एक अनुभवायला मिळाला. ऑगस्टमध्येही जगातील अनेक भागांत विक्रमी तापमानाची नोंद झाली.
WMOने म्हटले आहे की, एल निनोमुळे जगातील अनेक भागांमध्ये तापमान आणि पावसाच्या पद्धतीत मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांसारख्या टोकाच्या हवामान घटनांचा धोका वाढू शकतो. मात्र, एल निनोची तीव्रता सर्वच देशांमध्ये सारखाच परिणाम करेल असे नाही. त्याचा परिणाम प्रदेशानुसार वेगवेगळा असू शकतो.
एल निनोच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्याची गरज असल्याचे WMOने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय हवामान आणि जलविज्ञान विभागांसोबत समन्वय वाढवून पूर्वसूचना आणि हवामानविषयक माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
हिंदुस्थानवरही परिणाम होण्याची शक्यता
हिंदुस्थानच्या मान्सूनवरही एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी हवामान विभागाने (IMD) ऑगस्टच्या उत्तरार्धातील मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवत असल्याचे यापूर्वी म्हटले होते. मात्र, मान्सूनचा सुमारे तीन चतुर्थांश कालावधी पूर्ण झाल्याने विकसित होत असलेल्या एल निनोचा यंदाच्या मान्सूनवर आतापर्यंत मोठा परिणाम झालेला नाही.
दरम्यान, सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान इंडियन ओशन डायपोल (IOD) सकारात्मक स्थितीत जाण्याची शक्यता WMOने व्यक्त केली आहे. सकारात्मक IODमुळे एल निनोचा भारतावरील काही परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते.
ऑगस्टच्या अखेरीस IOD काही काळ सकारात्मक स्थितीकडे झुकला होता. मात्र, त्यानंतर तो पुन्हा तटस्थ स्थितीत परतला, असे IMDने म्हटले आहे.
हिंदुस्थानच्या हवामान विभागाने अद्याप मान्सूननंतरच्या हंगामाचा अधिकृत अंदाज जाहीर केलेला नाही. मात्र, एल निनोची वाढती तीव्रता पाहता यंदाच्या हिवाळ्यात थंडीचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.





























































