
दिल्लीत अनेक भागांत शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली विमानतळावरही पाणी भरले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जन्माष्टमीच्या उत्सवासाठी बाहेर पडलेले नागरिक अडकले. पावसाचा जोर वाढताच नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पालममध्ये सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 या वेळेत 3.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर नजफगडमध्ये सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत 0.5 मिमी पाऊस पडला.
पावसामुळे तीन विमानांचे मार्ग वळवले
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळ जलमय झाले आहे. पावसामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामान आणि विमानतळावरील परिस्थितीमुळे दिल्लीत उतरणारी तीन विमाने जयपूरला वळवण्यात आली आहेत. दिल्ली विमानतळावरील परिस्थिती सामान्य झाल्यावर आणि दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कडून परवानगी मिळाल्यावर तिन्ही विमाने दिल्लीकडे वळवण्यात येतील.


























































