हे कायदेशीर असले तरी न्याय्य नाही, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा SIR प्रक्रियेवर सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून, आता माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लवासा यांनी या मोहिमेला लाखो नागरिकांवर लादलेली अन्याय्य प्रक्रिया म्हटले आहे.

काय म्हणाले अशोक लवासा?

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स द्वारे आयोजित जगदीप सिंह चोकर यांच्या स्मृती सोहळ्यात बोलताना लवासा यांनी म्हटले की, “जरी न्यायपालिकेने आणि सरकारने या प्रक्रियेला कायदेशीर ठरवले असले तरी, ती न्याय्य आहे का? हा खरा प्रश्न आहे.” ते पुढे म्हणाले, “आजकाल वैधानिक संस्था, घटनात्मक संस्था आणि सरकारं अशा मानसिकतेतून काम करत असल्याचे दिसते की, एखादी गोष्ट कायद्याने मान्य आहे, म्हणजेच ती बरोबर आहे.”

१३ कोटी नावे वगळण्यावर आक्षेप

अशोक लवासा यांनी मतदार यादीतून तब्बल १३ कोटी नावे वगळण्याच्या तर्कशुद्धतेवर सवाल उपस्थित केला. आधीच ३३ टक्के लोक मतदान करत नाहीत, त्यात अशा मोठ्या प्रमाणावरील बदलांमुळे नागरिक लोकशाही प्रक्रियेपासून आणखी दुरावले जाऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत कोणीही मतदार वगळला जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी पुरेशी पावले उचलली जात आहेत का, असा सवालही त्यांनी विचारला.