
जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आणि त्या कृत्याची सोशल मीडियावर जाहीर बढाई मारत कबुली दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अखेर स्वतंत्र भारद्वाज याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून ताब्यात घेतले आहे. राजकीय नेत्यांच्या ओळखीचा दावा करून पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारद्वाजला पोलिसांच्या विशेष पथकांनी शिताफीने अटक केली.
टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान निशू आझाद या विद्यार्थिनीचे वडील संजय कुमार यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणाने नुकतेच तेव्हा गंभीर वळण घेतले, जेव्हा एका पॉडकास्टमध्ये स्वतंत्र भारद्वाज याने आपण एका व्यक्तीचे डोके फोडले आणि राजकीय संबंधांमुळे आपण यातून सहज सुटलो, अशी दर्पोक्ती केली. या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने भाजप नेते कपिल मिश्रा आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावांचाही उल्लेख केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक, अनेक सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत न्यायाची मागणी लावून धरली.
व्हिडrओ व्हायरल झाल्यानंतर सीजेपी, काँग्रेसची विद्यार्थी आघाडी आणि आझाद समाज पार्टीचे नेते व खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी पोलिसांना ७२ तासांत आरोपीला अटक करण्याचा अल्टीमेटम दिला होता. या वाढत्या दबावानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST ॲक्ट) अंतर्गत गंभीर कलमे वाढवली. आपल्यावर कारवाई होणार याची कुणकुण लागताच भारद्वाज आपल्या मुळगावाहून बुलेटवरून पसार झाला होता. मात्र दिल्ली पोलिसांच्या विविध पथकांनी सलग शोधमोहीम राबवून त्याला शुक्रवारी बुलंदशहर येथून ताब्यात घेतले.




























































