
देशभरात सामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या डिजिटल अरेस्ट सिंडिकेटविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. ऑपरेशन चक्र ६ अंतर्गत सीबीआयने देशभरातील २० राज्यांमधील तब्बल ८९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतर केंद्रीय यंत्रणेने ही देशव्यापी मोहीम हाती घेतली असून, या कारवाईदरम्यान हरयाणा आणि कोलकाता येथून तिघांना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान सीबीआयने मोठ्या प्रमाणावर बँक खात्यांचे रेकॉर्ड, आर्थिक दस्तऐवज आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. आरोपी या फसवणुकीच्या रकमा विविध बनावट बँक खात्यांमध्ये फिरवून त्या पुढे पाठवण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात हरयाणातील आकाश नावाच्या आरोपीच्या खात्यात १.९५ कोटी रुपये वळवण्यात आले होते, तर कोलकात्याच्या राजा करमाकर याच्या फर्मच्या बँक खात्यात १.५ कोटी रुपये जमा झाले होते. हे पैसे वेगवेगळ्या खात्यांत वळवून ते लपवण्यामध्ये या दोघांचा थेट सहभाग समोर आला आहे.
सीबीआयने या कारवाईत डिजिटल अरेस्टशी संबंधित तीन मोठ्या प्रकरणांचा तपास केंद्रित केला आहे. यामध्ये बिट्स पिलानीशी संबंधित एका व्यक्तीला स्वतःला पोलीस अधिकारी भासवणाऱ्या भामट्यांनी तब्बल तीन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून ७.६७ कोटी रुपयांना लुटले होते. तर गुजरातमध्ये अशाच पद्धतीने एका नागरिकाला तीन महिने धाक दाखवून तब्बल १९.२४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. कर्नाटकातील एका प्रकरणातही एका महिन्याच्या डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १५.४५ कोटी रुपये उकळले गेले होते.
जप्त केलेल्या सर्व डिजिटल उपकरणांची आणि बँक व्यवहारांची सध्या फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, या टोळ्यांनी राज्यांच्या सीमा ओलांडून उभारलेले आर्थिक व तांत्रिक जाळे उद्ध्वस्त करण्याचे काम सीबीआयकडून सुरू आहे. या सिंडिकेटमध्ये सामील असलेल्या इतर सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी देशभरात व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.




























































