
एयआच्या मदतीने प्लॅन करून पिकनिकचा प्लान करणे तीन तरुणांच्या चांगलेच अंगलट आले. एआयच्या सुचनेनुसार गिर्यारोहणासाठी गेलेले तीन गिर्यारोहक पर्वतावर अडकले. अखेर बचावासाठी तिघांनी बचाव पथकांशी संपर्क साधला. यानंतर बचाव पथकांनी तिघांचा शोध घेत दुसऱ्या दिवशी त्यांची सुखरुप सुटका केली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील तीन तरुण एका पर्वतावर गिर्यारोहणासाठी गेले होते. गिर्यारोहणासाचा प्लान करण्यासाठी या तरुणांनी एआयची मदत घेतली. त्यानुसार तिघे माऊंट शास्ताच्या शिखराकडे निघाले. सुरक्षित परतीसाठी निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे ते तिघे दुपारी 12 वाजता शिखरावर पोहचणे अपेक्षित होते. मात्र संध्याकाळी 7 वाजता हे तरुण शिखरावर पोहचले. त्यानंतर रात्री अंधारातच त्यांनी खाली उतरण्यास सुरवात केली. मात्र मूळ मार्गावरून ते रस्ता भरकटले आणि मड क्रीक कॅनयन भागात पोहोचले.
एआयच्या सल्ल्यानुसार, या तरुणांनी गरजेपेक्षा कमी अन्न, पाणी सोबत नेले होते. या दरम्यान एक गिर्यारोहक पाय घसरून पडल्याने त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. अखेर पर्वतावर अडकल्याने या तरुणांनी सिसकियू काउंटी शेरीफ कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
मड क्रीक कॅनयनमध्ये अडकल्यामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी यूएस फॉरेस्ट सर्व्हिसचे गिर्यारोहण रेंजर त्यांच्यापर्यंत पोहचेपर्यंत या तिघांना तिथेच तात्पुरता मुक्काम करावा लागला. गिर्यारोहकांना वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी शेरीफ कार्यालयाच्या शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर गिर्यारोहक आणि बचाव पथकाचे सदस्य सुरक्षितपणे ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणापर्यंत परतले.



























































