
मुंबईच्या अनेक भागांत पाणीटंचाईची झळ बसत आहे. भायखळा, वडाळा, डिलाईल रोड आदी भागांत पाणीपुरवठय़ाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबईत आधीच दहा टक्के पाणीकपात लागू आहे. ऑगस्टमध्ये पाऊस कमी झाल्याने सध्या ही पाणीकपात मागे घेणे शक्य नाही, अशी कबुली पालिका प्रशासनाने दिली. जलसाठ्याचे योग्य नियोजन, पाणीपुरवठय़ाचे प्रभावी व्यवस्थापन आणि नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, असे निर्देश पालिका प्रशासनाने आज दिले.
महापालिकेच्या जल अभियंता विभागाची आढावा बैठक शुक्रवारी पालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर म्हणाले की, ऑगस्ट 2026 मध्ये मुंबईत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यातदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमध्ये 30 सप्टेंबर रोजी 100 टक्के पाणीसाठा असेल तरच पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे असे म्हणता येते, मात्र आज मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया विविध धरणांतील पाणीसाठा सुमारे 95 टक्के आहे तोपर्यंत मुंबईत लागू असलेली दहा टक्के पाणीकपात मागे घेणे शक्य नाही.
- लागू असलेल्या पाणीकपातीबाबत लोकप्रतिनिधी, नागरिकांना अवगत करावे. त्याचेवळी वितरण व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या विनाविलंब दूर कराव्यात जेणेकरून पाणीकपातीची कमीत कमी झळ नागरिकांना पोहोचेल. पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास केवळ तात्पुरती उपाययोजना न करता तक्रारीच्या मूळ कारणांचा शोध घ्यावा. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश बैठकीत अधिकाऱयांना देण्यात आले.
उंचावरील वस्त्यांना झळ
मुंबई महानगरात दहा टक्के पाणीकपात लागू असून टोकावरील वस्त्या, उंचावरील भाग किंवा अन्य संवेदनशील क्षेत्रांना झळ पोहोचत आहे. पाणीकपातीमुळे काही प्रमाणात पाणीपुरवठय़ावर परिणाम होणे अपेक्षित असले तरी दहा टक्क्यांपेक्षा अधिक तुटवडा जाणवत असल्यास तेथील नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी जल अभियंता विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. पाणीपुरवठय़ाचे झोन लक्षात घेता ठरावीक दिवसांपैकी एक दिवस तरी पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून टोकाच्या भागात पुरेशा दाबाने पाणी पोहोचू शकेल, असे निर्देश देण्यात आले आहेत.































































