‘पादचारी प्रथम’ उपक्रमामुळे आरे स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळ, महाराष्ट्र दूध वितरक सेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ उपक्रमामुळे मुंबईतील 1811 आरे स्टॉल धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या उपक्रमासाठी प्रशासनाकडून आरे स्टॉलधारकांना नोटिसा पाठवून सात दिवसांत कागदपत्रांसह खुलासा मागितला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने संताप व्यक्त करत दुग्ध व्यवसाय विभागाच्या आयुक्तांची भेट घेतली. उपक्रमाच्या नावाखाली स्टॉलधारकांचे नुकसान झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ उपक्रमांतर्गत मुंबईभरातील आरे स्टॉलधारकांना नोटिसा पाठवून सात दिवसांत कागदपत्रांसह खुलासा मागितला आहे. तसेच हे स्टॉल स्थलांतरित करण्याचा विचार प्रशासन करत आहे. वरळी, कुर्ला आणि गोरेगाव येथील तिन्ही दुग्धशाळा बंद केल्यामुळे व्यवसाय टिकवण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी स्टॉलधारकांना नाईलाजाने इतर पदार्थांची विक्री करावी लागत आहे. हे स्टॉलधारक सर्व अनिवार्य परवाने काढून बृहन्मुंबई महापालिकेचे भुईभाडे नियमितपणे भरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आरे स्टॉल हटवणे किंवा स्थलांतरित करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती संघटनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त व बृहन्मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बेकायदेशीर फेरीवाले विक्रेत्यांचा बंदोबस्त करा

मुंबईतील पदपथांवर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे फेरीवाले, भाजी-फळविक्रेते आणि पदपथावर गॅस पेटवून वडापाव, इडली-डोसा, चायनीजसारखे अन्नपदार्थ बनवणाऱ्यांचा महापालिकेने आधी बंदोबस्त करावा. त्यानंतर आरे स्टॉल निष्कासित, स्थलांतर करणे किंवा शासन ताब्यात घेण्याचा विचार करावा, अशी विनंती संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.