
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षक केबिनसमोरच शिंदे गटाच्या ठेकेदाराने भाजपचे नगरसेवक व नगर परिषदेचे नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे यांना पायऱ्यांवरून ढकलून दिल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थकीत बिलांचे पैसे मिळत नसल्याच्या वादातून ही झटापट झाली.
नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे व ठेकेदार भरत नवगिरे सुरुवातीला एकमेकांशी काहीतरी बोलत होते. बोलता बोलता शिंदे तेथून जाण्यास निघाले, त्यावेळी अचानक भरत नवगिरे यांनी दिलेल्या धक्क्यामुळे शिंदे पायऱ्यांहून कोसळून थेट खाली उभ्या असलेल्या एका कारच्या दरवाजाजवळ पडले. नगर परिषदेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
यासंदर्भात संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. भरत नवगिरे यांनी त्यांची कामाची प्रलंबित बिले मिळण्यासाठी मदत करण्याबाबत शिंदे यांना सांगितले. त्यावेळी आपला या प्रकियेशी काहीही संबंध नसल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले असता आधी शांतपणे बोलणाऱ्या नवगिरे यांनी अचानक जोरदार धक्का देऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. तर भरत नवगिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.































































