
चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आणि याच दिग्दर्शनात कारकीर्द करायची असेल तर सहायक दिग्दर्शक म्हणून बराच काळ उमेदवारी करून हे दृश्य माध्यम कसं आहे, यात पटकथा, छायाचित्रण व संकलन या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत हे समजून घेणे आवश्यक असते. कुकू कोहली यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात दिग्दर्शक राहुल रवैल यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून केली. राहुल रवैल दिग्दर्शित ‘बेताब’च्या (1983) वेळी कुकू कोहली यांना या क्षेत्राची प्राथमिक ओळख झाली. त्यानंतर राहुल रवैल दिग्दर्शित ‘अर्जुन’, ‘डकैत’ अशा चित्रपटांच्या वेळी कुकू कोहली यांनी बरीच प्रगती केली आणि मग स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकले.
निर्माता दिनेश पटेल यांनी कुकू कोहली यांच्याकडे ‘फूल और काँटे’ (1991) या चित्रपटाचं दिग्दर्शन सोपवले. कुकू कोहली यांनी या चित्रपटासाठी आघाडीचे मारधाड दिग्दर्शक वीरू देवगण यांचा मुलगा अजय देवगण आणि हेमा मालिनी यांची भाची मधू यांची जोडी जमवली. अमरीश पुरी यांना वेगळी भूमिका दिली. याशिवाय अरुणा इराणी वगैरे कलाकारांची निवड केली. हा चित्रपट पूर्ण झाला आणि त्याचं प्रदर्शन करण्याचं ठरले तेव्हा त्याच शुक्रवारी म्हणजे 22 नोव्हेंबर 1991 रोजी या चित्रपटाच्या स्पर्धेत यश चोप्रा दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘लम्हे’ हा चित्रपट होता. त्यात अनिल कपूर आणि श्रीदेवी अशी जोडी असल्याने साहजिकच या चित्रपटाचं पारडं जड होते आणि त्याचे प्रदर्शनही अतिशय थाटात झाले. ‘लम्हे’ मुंबईत मेट्रो चित्रपटगृहात तर ‘फूल और काँटे’ सुपर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि जोपर्यंत प्रेक्षक चित्रपट पाहत नाही तोपर्यंत त्याच्या व्यावसायिक यशाचे चित्र स्पष्ट नसते याचा प्रत्यय या शुक्रवारी आला. ‘लम्हे’ पहिल्याच खेळापासून रसिकांनी नाकारला आणि ‘फूल और काँटे’ लोकप्रिय ठरला. अजय देवगण याला ‘गुंडा हीरो’ अशी प्रतिमा मिळाली, तर कुकू कोहली यांची दिग्दर्शक म्हणून अधिक आत्मविश्वासाने वाटचाल सुरू झाली.
कुकू कोहली यांनी ‘सुहाग’ (अजय देवगण, अक्षय कुमार, करिश्मा कपूर, नगमा), ‘हकिकत’ (अजय देवगण, तब्बू), ‘जुल्मी’ (अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना), ‘अनाडी नंबर वन’ (गोविंदा, रवीना टंडन) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
कुकू कोहली यांनी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटांत प्रामुख्याने टाळ्या शिट्टय़ांनी चित्रपट एन्जॉय करत असलेल्या पब्लिकला डोळ्यांसमोर ठेवले. विशेषतः एकपडदा चित्रपटगृहाच्या काळातील रुपेरी पडद्यासमोरील ‘पब्लिक’ हाच आपल्या चित्रपटाचा खरा आणि मोठा प्रेक्षक वर्ग आहे यावर त्यांचा विश्वास होता व तसं ते बोलूनही दाखवत. आपल्या या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या चित्रपटाचे मसाला मिक्स विषय सातत्याने नक्की केले.
या प्रवासात त्यांनी 1990 साली अरुणा इराणी यांच्याशी विवाह केला. ते त्यांचे दुसरे लग्न होते. पहिल्या संसारातील त्यांच्या मुली पूजा कोहली आणि करिश्मा कोहली चित्रपट व्यवसायात कार्यरत आहेत.
दिलीप ठाकूर































































