
कामोठ्यात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल बसमध्येच चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. घरी पोहोचल्यानंतर खूप पोटात दुखतंय, असे रडत सांगत या चिमुकलीने बसचालकाने केलेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. चिमुकलीचे बोलणे ऐकल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कामोठे पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करत नराधम चालक इस्को यादव (30) याला अटक केली.
पीडित चिमुकली कामोठे सेक्टर 36 येथील शाळेत शिकते. शाळा सुटल्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ती स्कूल बसने घरी जात होती. त्यावेळी स्कूल बसचालक इस्को यादव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित चालक कळंबोली सेक्टर 3 येथील माऊली मंदिराजवळ राहात असून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश इंगळे करीत आहेत. चिमुकलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पालकांमध्ये संतापाची लाट
स्कूल बसमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्कूल बसचालक आणि अटेंडंट यांची नियुक्ती करण्यापूर्वी स्कूल बसमालक आणि शाळा चालकांची पार्श्वभूमी तपासतात का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात का? असे सवाल यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत.































































