दोन कोटी नावे गाळली तशी दोन कोटी नावे मतदार यादीत घुसवूही शकतात, सावध राहा! भाजपचे निवडणुका जिंकण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन डावपेच – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसआयआर मोहिमेतून दोन कोटी नावे वगळली गेल्याबद्दल शंका उपस्थित केली आहे. यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असावे असा आरोप करतानाच, दोन कोटी नावे गाळली तशी दोन कोटी नावे मतदार यादीत घुसवूही शकतात. त्यामुळे सावध रहा, असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले.

बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या 250 बूथ लेव्हल एजंट्सनी (बीएलए) उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे आज भेट घेतली. त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, दत्ता गायकवाड, बीड जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, संपर्कप्रमुख मुजीब शेख, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि महायुतीचा चांगलाच समाचार घेतला. वाट्टेल ते करा आणि सत्ता मिळवा अशा पद्धतीने भाजप अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळून निवडणुका जिंकतेय. पश्चिम बंगाल आणि तामीळनाडूतील लाखो मतदार त्यांनी वगळले. आता महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार वगळले. बोगस मतदार नोंदीविरुद्ध पहिल्यांदा निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी आवाज उठवला होता. त्यांनी महाराष्ट्रात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत सहा महिन्यांत 45 लाख मतदार जास्त नोंदले गेल्याचे समोर आणले होते आणि आता दोन कोटी वगळले गेले. त्यांच्या नावावर भाजप बोगस मतदार घुसवू नयेत म्हणून बीएलएना त्यांच्या विभागातील प्रत्येक मतदार नावानिशी व चेहऱयानिशी ओळखता आला पाहिजे, अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

खारघरमध्ये एसआयआरचे बोगस फॉर्म झेरॉक्स करताना भाजपचे कार्यकर्ते रंगेहाथ पकडले गेले. नागपूरच्या आमदार निवासातही भाजपच्या जबाबदार नेत्यांच्या नावावर खोल्या बुक करून अशाच प्रकारे लोकांकडून फॉर्म भरून घेतले जात होते. या दोन्ही प्रकरणांचा भंडाफोड शिवसैनिक आणि युवासैनिकांनी केला होता. त्याचा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

राज्यभरातील शिवसैनिकांचा विमा काढणार

शिवसैनिक स्वतःचे घरदार आणि कुटुंब बाजूला ठेवून पक्षासाठी, जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस झोकून देऊन काम करत असतो. ग्रामीण भागात दऱयाखोऱयात वणवण फिरत असतो. संघटनेच्या माध्यमातून तो जनतेची कामे करत असताना काही बरेवाईट होऊ नये आणि त्याचे कुटुंब वाऱयावर पडू नये म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या विम्याची योजना सुरू केली होती. बीडच्या पदाधिकाऱयांनी हीच योजना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने अधिक चांगल्या पद्धतीने पुनरुज्जीवित केली आहे, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. तसेच ही योजना राज्यभरातील सर्व शिवसैनिकांसाठी आणि बीएलए कार्यकर्त्यांसाठी लागू केली जाईल, असेही ते म्हणाले.

जनतेची कामे करायला सत्ता हवी आहे

शिवसेनेला जनतेची सेवा प्रभावीपणे करण्यासाठी सत्ता हवी आहे. गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि रोजगार या मूलभूत गरजा सर्वसामान्यांना पुरवण्यासाठी अधिकार हवा म्हणून शिवसेनेला सत्ता हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना सत्तेत असताना शेतकऱयांची थेट कर्जमुक्ती केली होती, आजच्या सत्ताधाऱयांसारखा केवळ ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असा भ्रष्टाचार शिवसेनेने केला नाही, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला. जनतेच्या सेवेचे शिवबंधन आपण हाती बांधलेय त्याचे पावित्र्य जपा. शिवसैनिक आपला पाठीराखा आहे, असा विश्वास द्या, असे आवाहन त्यांनी केले.

बीड पुन्हा भगवा होईल

गोपीनाथ मुंडे यांच्याशी ठाकरे कुटुंबीयांचे व शिवसेनेचे अतिशय घट्ट काwटुंबिक संबंध होते. त्यावेळची युती आजच्यासारखी कपटी नव्हती. मुंडे यांच्यावरील प्रेमाखातर शिवसेना बीड जिह्यातील जागा भाजपला सोडत गेली, पण त्यामुळे बीडमध्ये शिवसेनेचे अस्तित्व कमी होत गेले. आता पुन्हा एकदा बीड जिल्हा भगवा करण्याची संधी चालून आली आहे आणि तो भगवा होईल याची खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटू

येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण छत्रपती संभाजीनगरला येत असून तेथील आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यानंतर दसरा मेळाव्याला नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर पुन्हा एकत्र येऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या नावाचा दुरुपयोग करणाऱयांचा निकाल लवकरच लागेल

बीडमधील शिवसैनिक आणि बीएलएंसाठी सुरू करण्यात आलेली विमा योजना ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावानेच मिळणार आहे. तो धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर प्रहार केला. शिवसेनेच्या नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत, त्यांचा समाचार शिवसेना घेतेच आहे आणि त्यांचा निकालही लवकरच लागेल याचीही शिवसेनेला खात्री आहे, असा भीमटोला त्यांनी लगावला.