
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून त्याला खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता कायम आहे. ज्यावर बीसीसीआय लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती समोर येत आहे.
सुंदर पूर्णपणे तंदुरुस्त
दुखापतीमुळे मैदानापासून दूर असलेल्या सुंदरच्या पुनरागमनामुळे हिंदुस्थानी फिरकी आणि अष्टपैलू विभाग मजबूत होतील. पण बुमराच्या तंदुरुस्तीची अजून चाचणी व्हायची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमरा 9 सप्टेंबरला एका विशेष सामन्यात खेळून आपला फिटनेस सिद्ध करणार आहे. त्यानंतर बीसीसीआयची वैद्यकीय टीम आणि निवड समिती अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय घेतील.
हर्षित, नितीशची तंदुरुस्ती अनिश्चित, हार्दिक पंडय़ा बाहेर
युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांनाही तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. या तिन्ही खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, पण त्यांचा सहभाग तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि तो या मालिकेतून बाहेर असेल.


























































