
मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडे जेवढे पर्याय होते तेवढे आम्ही केले, आता आमचे शिष्टमंडळ जरांगे यांच्याकडे जाणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आहे. यावर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोडगोड बोलून तुम्ही मराठय़ांचे वाटोळे केले आणि आता पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही, असे ठणकावत त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठा आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारच्या लढाईची घोषणा करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे तसेच त्यांनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात आता अचानक विखे-पाटील यांनी यापुढे जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ जाणार नाही. आता त्यांनीच सरकारला समजून घ्यावे, अशी भूमिका मांडली आहे. त्यावर जरांगे यांनी सरकारला समजून घ्यायला सरकार काय आमचा बाप आहे का? मराठय़ांचे वाटोळे करायला उपसमितीचे अध्यक्ष झालात का? विखे पाटील यांच्याकडे जोपर्यंत मराठा उपसमितीचा आणि मंत्रिमंडळाचा शिक्का आहे, तोपर्यंत त्यांना मराठय़ांचे काम करावेच लागेल, अशा शब्दांत जरांगे यांनी विखे पाटील आणि राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.
ठोस निर्णयाच्या दिशेने पुढे या
मराठा समाजाच्या मागण्यांचा मोठा भाग अद्याप प्रलंबित असताना सरकारने पर्याय संपल्याचे सांगणे योग्य नाही. सरकारने चर्चा थांबवली तरी मराठा समाजाच्या आंदोलनावर त्याचा परिणाम होणार नाही. सरकारला चर्चा करायची असेल तर ठोस निर्णयाच्या दिशेने पुढे यावे, असे जरांगे म्हणाले.
गोड बोलून फडणवीसांचे स्वप्न विखेंनी पूर्ण केले
फडणवीस यांनी विखेंना आमच्यात घातले, गोड बोलून आमचे एक वर्ष वाया घालवले आणि मराठय़ांचे वाटोळे करण्याचे फडणवीसांचे स्वप्न विखेंनी पूर्ण केले. वेळ पडल्यास विखेंनी राजीनामा देऊन फडणवीसांनाही सोडायला पाहिजे होते, पण ते तसे करणार नाहीत. कारण ते केवळ पैशाच्या आणि मोठय़ांना मॅनेज करण्याच्या जिवावर राजकारण करतात, अशी टीका जरांगेंनी केली.
कोणाच्या ताटातलं काढून कोणाला देणार नाही ः फडणवीस
आजपर्यंत मराठा समाजाला जे काही दिलंय ते आम्हीच दिलंय. केवळ कागदावरचे निर्णय नाही, प्रत्यक्ष फायदा मराठा समाजाला झालेला पाहायला मिळाला. संविधानात जे असेल ते निश्चित मिळेल. कोणाच्या ताटातलं काढून कोणाला देणार नाही. मराठा समाज किंवा इतर समाज असो सर्व समाजांना आम्हीच न्याय देणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आता आम्ही कुणालाही विनंत्या करणार नाही. आमची क्षमता आहे सरकारच्या मानगुटीवर बसायची आणि त्यांना गुडघ्यावर टेकवण्याची. मराठा समाज आता पेटून उठला आहे. 12 तारखेला मुंबईला जाणारच.





























































