
धावत्या स्कूल व्हॅनमधून पडून तिसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात घडली. व्हॅनचा दरवाजा अचानक उघडल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना विजयराघवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संबंधित विद्यार्थी शाळेतून घरी परतत असताना ही दुर्घटना झाली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जीत यादव असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो खासगी शाळेत शिकत होता. व्हॅनचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे जीतचा तोल गेला आणि तो चालत्या वाहनातून रस्त्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. आसपासच्या लोकांनी त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या भागातील खाजगी शैक्षणिक संस्था सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना आणि सुरक्षिततेच्या मानकांकडे उघडपणे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांनी केला आहे. याप्रकरणी चालकाचा निष्काळजीपणा, वाहनाची योग्यता आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिका यांबाबत तपास करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.



























































