
>> दुर्गेश आखाडे
गणपती बाप्पा मोरया म्हणत चाकरमानी कोकणात मुंबई-गोवा महामार्गावरून रवाना होणार आहे. महामार्गावरून प्रवास करत असताना चाकरमान्यांना चिपळूण ते आरवली, उक्षी ते वांद्रे दरम्यान आणि वाकेड जवळ त्रास सहन करावा लागणार आहे. एकेरी वाहतूक सुरू असलेल्या निवळी आणि लांज्यातील पुलावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. वाहतूक कोंडीतून मान वर काढून प्रवास करताना पुढे सिंधुदुर्गपर्यंत गाडी सुसाट जाणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यात अजून काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना काही भागातून प्रवास करताना त्रास सोसावा लागणार आहे. लांजा येथील सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. संगमेश्वर पुलाजवळील एका बाजूच्या सर्व्हिस रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
इथे काम अपूर्ण
चिपळूण ते आरवली – ५९५ मीटर
आरवली ते कांटे – ५७० मीटर
कांटे ते वाकेड- १५० मीटर
चिपळूणच्या पुलाची प्रतीक्षाच!
मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाचे काम पुरे करण्यावर भर देण्यात आला असून लांजा आणि निवळी येथील पुलांवरून एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर आणि पाली येथील पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. चिपळूणच्या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने यंदाच्या गणेशोत्सवात यापरिसरात चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.




























































