हिंदुस्थानचा दौरा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला मालामाल करणार! आताच 50,000 हून अधिक तिकिटांची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर महिन्यात हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 6 वर्षांनी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे मातब्बर संघ न्यूझीलंडमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. उभय संघांमध्ये टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याच उत्साहाचा फायदा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला होताना दिसत आहे. दौरा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. मात्र, आताच संपूर्ण दौऱ्यासाठी 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सोमवारी तिकिटे विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तुफान प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्याची 75 टक्के तिकिटे आधीच विकली गेली असून, अनेक सामने ‘हाउसफुल’ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेतील सामन्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आयोजकांना विशेष व्यवस्था करावी लागत आहे. ऑकलंडच्या ऐतिहासिक ईडन पार्कवर होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी तिकिटांची विक्रमी मागणी नोंदवली गेली आहे. चाहत्यांचा वाढता ओघ पाहता, 2019 मधील हिंदुस्थानच्या दौऱ्यानंतर पहिल्यांदाच स्टेडियमच्या वरच्या थरातील (सिक्स टियर) आसनव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 30 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्यासाठी ही स्टँड्स प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहेत, ज्यावरून या द्विपक्षीय मालिकेची लोकप्रियता स्पष्ट होते.

मागील आर्थिक वर्षात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला 7 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मोठा आर्थिक फटका बसला होता. बोर्डाला या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी 37 दिवसांच्या या महा-मालिकेचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे, ज्यामध्ये 5 टी-२०, 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. टीम इंडियाचा हा दौरा आणि आतापर्यंत विकली गेलेली 50 हजारांहून अधिक तिकिटे यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला आनंदाच वातावरण असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.