
मुंबईहून लंडनसाठी निघालेल्या ‘एअर इंडिया’च्या AI131 या विमानाच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ब्रिटनच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणेत अचानक उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे लंडनला जाणारे हे विमान स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे वळवण्यात आले. त्यामुळे गेल्या ९ तासांहून अधिक काळ शेकडो प्रवासी झुरिच विमानतळाच्या वेटिंग एरियामध्ये अडकून पडले आहेत.
९ तासांपासून प्रवाशांचा खोळंबा
झुरिच विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या नऊ तासांपासून विमानतळावर ताटकळत बसले आहेत. मुंबईहून थेट लंडनला पोहोचण्याच्या अपेक्षेने निघालेल्या या प्रवाशांना अचानक स्वित्झर्लंडमध्ये उतरवण्यात आले. मात्र, आता तिथून पुढचा प्रवास कधी सुरू होणार आणि ते लंडनला कधी पोहोचणार, याबाबत कोणतीही निश्चित माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळाचे वातावरण आहे.
ब्रिटनमध्ये १००० हून अधिक उड्डाणे प्रभावित
ब्रिटनच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील बिघाडामुळे १००० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. लंडनच्या हिथ्रोसह अनेक प्रमुख विमानतळांवरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून जगभरातील प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
ब्रिटनच्या ‘नॅशनल एअर ट्रॅफिक सर्व्हिसेस’ने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट प्रोसेसिंग सिस्टीममध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. तांत्रिक पथकाने हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले असले, तरी विस्कळीत झालेले उड्डाणांचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास बराच वेळ लागत आहे.
प्रवाशांचा जीव टांगणीला
हिथ्रो विमानतळावर काही विमानांचे संचालन हळूहळू सुरू करण्यात आले असले तरी प्रवाशांना अजूनही मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत झुरिचमध्ये अडकलेल्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांचा मुक्काम आणखी किती वेळ वाढणार आणि ते अखेर लंडनला कधी पोहोचणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



























































