पंजाब नॅशनल बँकेत 17.29 कोटी रुपयांच्या बनावट नोटा, तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बनावट नोटांच्या मोठ्या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, पंजाब नॅशनल बँकेत (PNB) 17.29 कोटी रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अधिकारी अमित कुमार यांना सोमवारी अटक केली. सहारनपूरच्या सोफिया मार्केट परिसरातील PNBच्या करन्सी चेस्टमध्ये बनावट भारतीय चलनी नोटा आढळल्यानंतर बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक रवी कुमार कंसे, सोफिया मार्केट करन्सी चेस्टचे व्यवस्थापक सुशील कुमार आणि जगाधरी करन्सी चेस्टचे व्यवस्थापक अमित कुमार हे दोषी आढळले होते. बँकेने तिघांनाही निलंबित केले असून, पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआउट नोटीसही जारी केली होती. या तिघांचे नेपाळमध्ये पळून जाण्याचे प्रयत्न असू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर SIT आणि क्राइम ब्रांचकडून तिघांच्या घरांची झडती घेण्यात आली. यावेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांच्या संपर्क, हालचाली आणि अन्य व्यक्तींशी असलेल्या संभाव्य संबंधांचा तपास सुरू आहे.

NIAने 3 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास ताब्यात घेतल्यानंतर प्रकरण पुन्हा नोंदवले आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी सहारनपूरमधील सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 178 अंतर्गत FIR दाखल करण्यात आली होती. बनावट नोटा एखाद्या व्यक्तीकडून, तस्करीच्या ठिकाणाहून किंवा सीमावर्ती भागातून जप्त झालेल्या नसून थेट बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये आढळल्याने तपासाचे गांभीर्य वाढले आहे. या नोटा बँकिंग व्यवस्थेत नेमक्या कशा पोहोचल्या आणि त्यातील काही नोटा वैध बँकिंग माध्यमातून चलनात गेल्या का, याचा तपास NIA करत आहे. तपासानुसार, 6 जुलै रोजी सहारनपूरहून RBIच्या जयपूर कार्यालयाकडे 111 कोटी रुपयांची रोकड पाठवण्यात आली होती. या खेपेत 500 रुपयांच्या नोटांची 1,900 बंडले आणि 200 रुपयांच्या नोटांची 800 बंडले होती. या रोख रकमेचे पॅकिंग आणि पाठवणीची प्रक्रिया तपासली जात असून, ही खेप एका पार्ट-टाइम हाऊसकीपरकडे सोपवण्यात आल्याचेही समोर आले आहे. चलनाच्या साखळीत बनावट नोटा नेमक्या कोणत्या टप्प्यावर दाखल झाल्या, याचा शोध घेतला जात आहे.

बनावट नोटा बँकेच्या शाखा आणि ATMपर्यंत पोहोचल्या होत्या का, याचाही तपास यंत्रणा शोध घेत आहेत. त्यामुळे करन्सी चेस्टमध्ये सापडलेल्या बनावट नोटांपैकी किती नोटा बाहेर पडल्या आणि प्रत्यक्ष चलनात आल्या का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, अद्याप किती बनावट नोटा चेस्टबाहेर गेल्या याची निश्चित माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणात संभाव्य नेपाळ कनेक्शनचाही तपास केला जात असून, तिन्ही अधिकाऱ्यांचे नेपाळच्या सीमेजवळ किंवा नेपाळमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती अथवा गटांशी संबंध होते का, हे तपासले जात आहे.