
डॉक्टरांना शिवीगाळ व कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी अखेर शिंदे गटाच्या पालघरमधील सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात शहरप्रमुख राहुल घरत, जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचाही समावेश आहे. मात्र ही कारवाई म्हणजे केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. पालघरमधील सातजणांना शिंदे गटातून हाकलले असले तरी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णाल यातही डॉक्टरांवर असाच हल्ला करणारा नगरसेवक रमेश म्हात्रे याची हकाल पट्टी कधी करणार, असा थेट सवाल करण्यात येत आहे. दरम्यान राहुल घरत याला दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांवर पालघरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यावरून शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख कुंदन संखे व शहरप्रमुख राहुल घरत याच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. तसेच तेथील डॉ. लिजिमोल व डॉ. विशाल कोडगिरकर यांना शिवीगाळ केली. तर तेथील कर्मचारी विवेक झिंगा याला राहुल घरत याने बेदम मारहाण करत त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीची दखल घेत शहरप्रमुख व जिल्हाप्रमुखासह मनीष उर्फ विकी संखे, साईराज पाटील, आमदार पुत्र रोहीत गावीत, राहुल संखे, ऋषभ वारे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पालघरमधील घटनेला एक न्याय व डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी दुसरा न्याय का, असा सवाल केला जात आहे.




























































